रचताना पत्त्यांचा बंगला
हवाही थांबून पाहत राहते;
एक एक पान भिंतीपाशी
विट बनून उभे राहते !
तंबूवजा त्रिकोणी खोल्या
एकावर एक चढ़त राहतात;
कधी सावध तर कधी बेसावध
सारखी पडझड होत राहते !
मजल्यांवर चढ़ताना मजले
पाने कमी होत जातात;
शेवटची पत्त्यांची जोडी
छताशिवायच संसार थाटते !
बंगल्यासमोरच्या अंगणात
भतुकलीचा रंगतो खेळ;
आणि बंगल्याची प्रत्यक भिंत
त्या खेळाची गोडी चाखत राहते !
अचानक छोटीशी झुळूक
बंगल्याचा थरकाप उडवते;
आज कोसळताना उद्याची उमेद मात्र
उंचच उंच जात राहते !
नितीन.


