ऊन आणि पाऊस


रणरणतं ऊन
बरंच काही करू शकतं….
नेहमी खळाळणार्या
गावच्या नदीला आटवू शकतं…
उजाड पायवाटेवर चालणार्या
थकलेल्या अनवाणी पायांना
सावलीसाठी भटकायला लावू शकतं…
दोनशे वर्षं जगलेल्या
निष्पर्ण खोडांना
उभ्या उभ्या जाळू शकतं…
पण इवल्याशा डोळ्यांत
पाऊस पडायला लागला,
तर हेच रणरणतं ऊन
पूर्णपणे हतबल होऊन जातं…

गरजणारा, बरसणारा पाऊसही
बरंच काही करू शकतो…
ओसाड मातीतही
अंकूर फुलवू शकतो…
काळ्या दगडांच्या उंच भिंती
झर्यांनी सजवू शकतो…
प्रेमाने उभी असणारी घरं
निर्दयपणे वादळात
वाहून नेऊ शकतो…
काहीतरी मिळवण्यासाठी
घराबाहेर पडलेले पाय
चिखलात रुतवू शकतो आणि
त्याच चिखलात,
बालगोपाळांना खेळवूही शकतो…
पण एखादं कोरडं मन
टिचभरही भिजवण्यात
हाच गरजणारा पाऊस,
नेहमी अपयशी ठरतो…

– नितीन.

यावर आपले मत नोंदवा